एक आटपाट नगर होतं, नगरात एक शाळा होती,
शाळेमधल्या वर्गामध्ये, तो होता, ती होती...
तो खूप हुशार होता, तीही खूप हुशार होती,
दरवर्षी वरच्या नंबरात, तो होता, ती होती...
तो हुशार, ती हुशार, दोघांमध्ये ओळख होती,
तिला त्याचा आदर होता, त्याला ती आवडत होती...
मधून स्पर्धा, मधून मैत्री, एकेक कळी उमलत होती,
धुंद मनाच्या लहरींमध्ये, तो होता, ती होती...
शाळा, क्लास अन् अभ्यास, बोलण्याचीही संधी नव्हती,
गूज मनीचे मनीच राखत, तो होता, ती होती...
पाहता पाहता कशी कळेना, निसटलीच हातातुन रेती,
निकाल शेवटला घेताना, तो होता, ती होती...
शाळा सुटली, पाटी फुटली, त्यांची दिशा बदलली होती,
वेगवेगळ्या मार्गांवरती, तो होता, ती होती...
गेला त्यांचा काळ तरीही, शाळेला ते दिवस आठवती,
इथेच कोण्या एका काळी, तो होता, ती होती...
Sunday, September 27, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment