Friday, September 25, 2009

सर्व काही आत आहे...

सहज-सोपे भासते कविता प्रसविणे,
गोषवारा माझिया डोक्यात आहे

असूदे भारी कितीही लेखणी ही,
पेलण्याची शक्ति या हातात आहे

कल्पनाविश्वात करितो मी विहार,
दौडण्याची शक्ति या पायात आहे

जे न देखे रवी तेही पाहतो मी,
दूरवरची चमक या डोळ्यात आहे

अडचणी येती कितीही अन् कशाही,
सोसण्याची धमक या धमन्यांत आहे

पाहिली सृष्टीत या दुःखे कितीक,
तरीही आनंद या हृदयात आहे

प्रश्न का बाहेरचे पडतात मजला,
पाहिजे ते सर्व काही आत आहे

No comments: