Friday, September 25, 2009

अलिप्त

न देणे, न घेणे, फुकाचे न खाणे,
कुणाच्या न वाटेत येणे कधीही,
बरे काम माझे, बरी वाट माझी,
स्वत:च्याच विश्वात मश्गूल आम्ही १

असे वाटले की लिहावे जरासे,
लिहावे जरा, पाठवावे कुठेसे,
तया सोडुनी या जगाच्या भरोसे,
विचारात होऊ पुन्हा दंग आम्ही २

कधी आवडावीत काव्ये कुणाची,
दिसावी कधी झेप कोणा मनाची,
जरी दाद देऊ तया ताकदीची,
मनाच्या महाली असू गुंग आम्ही ३

न लाटात आम्ही, न वाळूत आम्ही,
सदा एकटे सागराच्या किनारी,
जसा सूर्य चाले सकाळी दुपारी,
तसे राहतो या अलिप्तात आम्ही ४

No comments: