Monday, November 9, 2009

अतृप्त

का घशाखाली शिरेना घास आता,
कोणती लागे मनाला आस आता? ||१||

पार केले मी हजारो सागरांना,
का खुणावे ही नदी डोळ्यांस आता? ||२||

घेतले होते फुलांचे गंध सारे,
हा नवा येई कशाला वास आता? ||३||

धावलो रस्ते किती श्वासात एका,
का उरे माझ्या उरी हा श्वास आता? ||४||

देह गेला, जीव का अतृप्त आहे,
का शिवेना कावळा पिंडास आता? ||५||