Monday, February 1, 2010

मनात माझ्या...

मनात माझ्या विचार आले,
अफाट वेगामधे पळाले,
कुठून आले, कुठे निघाले,
कळे न काही...

मनात माझ्या उरे न जागा,
लगाम नाही विचारवेगा,
हजार घोडे लहान पागा,
कळे न काही...

मनात माझ्या अनेक वाटा,
दिशादिशांना अनेक लाटा,
जिथे बघावे नवीन फाटा,
कळे न काही...

मनात माझ्या विचार आले,
सुसाट वेगे नभी उडाले,
विहार केला, उडून गेले,
कळे न काही...

1 comment:

नरेंद्र गोळे said...

खुशाल स्फुरू दे विचार सारे,
अफाट वेगामधे पळू दे,
स्वार तयांवर नकोस होऊ,
सुखे पळू दे...

मनात होवो खुशाल गर्दी,
नको विचारा देऊस वर्दी,
एकच घोडा हवा मनाला,
तोच राहू दे...

मनास फुटू दे असंख्य वाटा,
दिशादिशांना अनेक लाटा,
दिसत्या लाटेवरी स्वार हो,
तिला विरू दे...

मनात विचार येवो आले,
सुसाट उडले, तयां उडू दे,
उन्नतीचा परि विचार एकच,
तया उरू दे...